यावल : सुरेश पाटील
रावेर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ सदस्य पदाचे ‘स्वप्न’ पाहणारे जे कोणी अपक्ष किंवा राजकीय पक्षाचे इच्छुक भावी उमेदवार आहेत ते आधी १९६२ पासून अनुक्रमे यावल व आताचा रावेर विधानसभा क्षेत्राचा तसेच १९५२ पासूनचा जळगाव लोकसभा मतदारसंघापासून तर आताच्या रावेर लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, संस्कृतीचा राजकारणाचा भूतकाळ, वर्तमानकाळाचा भविष्यकाळाचा विचार करणार आहेत किंवा नाही? असे रावेर लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील सर्व स्तरातील समाजात, राजकारणात चर्चिले जात आहे.
रावेर विधानसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील शेतकरीवर्गासह सर्व जाती धर्मातील, सर्वस्तरातील मतदार हा फार ‘हुशार’ आणि ‘चतुर’ आहे. निवडणूक रिंगणात कोणकोणत्या राजकीय पक्षातर्फे किंवा अपक्ष उमेदवारी घेणार आणि मतदारसंघातील विविध प्रश्न कोण सोडविणार? किंवा सोडवू शकतो? त्याचा अभ्यास सर्व स्तरातील मतदारांना आहे. राज्यासह केंद्रातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मतदार आपल्या आवडत्या उमेदवारांलाच मतदान करून विजयी करीत असतात. मग तो उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा अपक्ष उमेदवार असो वैयक्तिक स्वार्थ व हेतू साध्य करणाऱ्या उमेदवारास मतदार प्राधान्य देत नाहीत. रावेर यावल तालुका आणि आताचा रावेर विधानसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील गेल्या ५० ते ६० वर्षाचा राजकीय इतिहास लक्षात घेता मतदार संघात दोन ते तीन वेळेस प्रबळ उमेदवारांना आणि नवख्या उमेदवारांना मतदारांनी डावलून काम करणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. म्हणून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इच्छुक भावी उमेदवारांनी अतिआत्मविश्वास न बाळगता आपल्या मतदारसंघातील भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा विचार, अभ्यास करून मतदारांचा, नागरिकांचा नेमका कल कोणत्या बाजूने आहे, त्याचा विचार करून निवडणूक रिंगणातील उमेदवारीचे स्वप्न पहायला पाहिजे..? अन्यथा मतदार राजा हा आपल्या मतदार संघाचा हिताचा निर्णय घेईलच, असे तुर्त राजकीय चित्र निर्माण झाले आहे.
रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील मतदार किती हुशार आणि चाणाक्ष आहे याचा अभ्यास १९५२ पासून २०१९ पर्यंतचे माजी खासदार माजी आमदार यांना मतदारांनी कशी संधी दिली आहे याबाबत इच्छुक सर्व भावी उमेदवारांनी राजकारणातील भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा विचार करायला पाहिजे? असे लक्षात येईल.
लोकशाहीतील पहिली लोकसभा १९५२ ते १९५७ त्या वेळेला रावेर लोकसभा मतदारसंघ न होता जळगाव लोकसभा मतदारसंघ होता. त्यावेळेस पहिल्या लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे हरी विनायक पाटसकर विजयी झाले होते. त्यानंतर १९५७ ते १९६२ च्या कालावधीत जळगाव लोकसभा सदस्य खासदार म्हणून नौशेर भरूचा अपक्ष म्हणून १९६२ ते ६७ या तिसऱ्या लोकसभेत काँग्रेसचे जे.एस.पाटील, चौथ्या लोकसभेत १९६७ ते ७१ यादरम्यान एस.एस.सय्यद काँग्रेसतर्फे, पाचव्या लोकसभेत १९७१ ते ७७ कृष्णराव पाटील, सहावी लोकसभा १९७७ ते १९८० जनता पक्षातर्फे यशवंत बोरोले, अनुक्रमे सातवी आठवी नववी या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये १९८० ते १९९१ कालावधीत यादव शिवराम महाजन आय काँग्रेसतर्फे, दहावी लोकसभा १९९१ ते १९९६ निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे गुणवंतराव रामभाऊ सरोदे, अकरावी लोकसभा १९९६ ते १९९८ पुन्हा दुसऱ्यांदा गुणवंतराव रामभाऊ सोनवणे, बारावी लोकसभा १९९८ ते ९९ काँग्रेसतर्फे डॉ.उल्हास वासुदेव पाटील, तेरावी लोकसभा १९९९ ते २००४ व २००४ ते २००७ वाय.जी.महाजन भाजपतर्फे, चौदावी लोकसभा २००७ ते २००९ हरिभाऊ जावळे, पंधरावी लोकसभा २००९ ते २०१४ ए.टी.नाना पाटील भाजपातर्फे पुन्हा सोळावी लोकसभा दुसऱ्यांदा २०१४ ते २०१९ ए.टी.नाना पाटील. यानंतर सोळावी लोकसभा २००९ ते २०१४ रावेर लोकसभा मतदारसंघ निर्माण होऊन त्यात भाजपाचे हरिभाऊ जावळे, यानंतर २०१४ ते २०१९ आणि २०१९ ते २६ ऑगस्ट २०२३ भाजपतर्फे रक्षा खडसे खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.
याचप्रमाणे १९६२ यावल विधानसभा मतदारसंघातून रमाबाई नारायणराव देशपांडे, १९६७ मध्ये काँग्रेसतर्फे जीवराम तुकाराम महाजन १९७२ मध्ये जीवराम तुकाराम महाजन, १९७८ मध्ये जेएनपी पक्षातर्फे सिंधुताई चौधरी, काँग्रेस यु पक्षातर्फे १९८० व १९८५ मध्ये जीवराम तुकाराम महाजन त्यानंतर १९९० मध्ये काँग्रेसतर्फे रमेश विठ्ठल चौधरी, १९९५ मध्ये काँग्रेसतर्फे रमेश विठ्ठल चौधरी, १९९९ मध्ये भाजपातर्फे हरिभाऊ माधव जावळे, २००४ मध्ये काँग्रेसतर्फे रमेश विठ्ठल चौधरी तसेच स्वतंत्र असलेल्या रावेर मतदार संघात १९६२ पासून तर १९७८ पर्यंत म्हणजे चार पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसतर्फे मधुकरराव धनाजी चौधरी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर १९८० मध्ये काँग्रेस आयतर्फे रामकृष्ण रघुनाथ पाटील, १९८५ मध्ये भाजपतर्फे गुणवंतराव रामभाऊ सरोदे, १९९० मध्ये काँग्रेसतर्फे मधुकरराव धनाजी चौधरी, १९९५ मध्ये भाजपातर्फे अरुण पांडुरंग पाटील, १९९९ मध्ये काँग्रेसतर्फे राजाराम गणू महाजन, २००४ मध्ये भाजपतर्फे अरुण पांडुरंग पाटील, २००९ मध्ये अपक्ष शिरीष मधुकरराव चौधरी, २०१४ मध्ये भाजपतर्फे हरिभाऊ जावळे, २०१९ मध्ये काँग्रेसतर्फे शिरीष मधुकरराव चौधरी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत
२००९ मध्ये नवीन रावेर विधानसभा मतदारसंघ निर्माण होऊन त्यात अपक्ष उमेदवार म्हणून शिरीष मधुकरराव चौधरी, २०१४ मध्ये भाजपतर्फे हरिभाऊ माधव जावळे, २०१९ मध्ये काँग्रेसतर्फे शिरीष मधुकरराव चौधरी हे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. अशाप्रकारे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इच्छुक भावी उमेदवारांनी गेल्या ५० ते ५५ वर्षातील लोकसभा विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा आढावा घेऊन अतिआत्मविश्वास न बाळगता किंवा वैयक्तिक मत मतदारांवर न लादता उमेदवारी घेतल्यास मतदारांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू शकतो, असे रावेर विधानसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकारणात चर्चिले जात आहे.