
मुंबई ः प्रतिनिधी
भाजपाच्या तेलंगणातील एका खासदारांचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. या व्हिडीओमध्ये त्यांनी केलेल्या दाव्यानंतर त्यावरून विरोधकांनी आता मोदी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सत्ताधारी भाजपा व केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले जात आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतानाच या खासदारांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला आहे.
काय म्हणाले खासदार डी. अरविंद?
तेलंगणातील भाजपा खासदार डी. अरविंद यांनी केलेल्या एका विधानावरून ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच्या वॉशिंग मशीनमधील मोदी साबणाची चर्चा जगभर सुरू आहे. त्यात भर घातली आहे ती भाजपचेच खासदार डी. अरविंद यांनी. त्यांनी बेशकपणे, निर्भयपणे सांगितले की, ‘मतदारहो, तुम्ही कोणतेही बटन दाबा, मत भाजपलाच जाणार. आएगा तो मोदी ही’. याचा सरळ अर्थ असा की, भाजप ‘ईव्हीएम’ घोटाळा करून लोकसभा निवडणुका जिंकत आहे”, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
‘ईव्हीएम’ हॅक करून विजय संपादन करणे हेच भाजपचे सूत्र असल्याचे भाजपचे खासदार सांगत असतील तर भारताचा निवडणूक आयोग यावर काय पाऊले उचलणार आहे? खरे तर निवडणूक आयोगाकडूनही आता कोणत्याच अपेक्षा ठेवता येणार नाहीत. कारण ‘ईव्हीएम’बरोबर सत्तापक्षाने निवडणूक आयोगालाच ‘हॅक’ केले आहे. भाजपच्या पेंद्रीय सरकारचा तो हरकाम्या बनला आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटाने निवडणूक आयोला लक्ष्य केले आहे.
“भाजपाचे मुलुंडकर नागडे पोपटलाल”
“भारतीय जनता पक्षाचे आज ‘ईव्हीएम’वरचे प्रेम उतू चालले आहे, पण ‘ईव्हीएम’ सुरक्षित नाही व मशीनमध्ये सेटिंग करून गोलमाल करता येतो हा पुराव्यासह शोध भाजपनेच लावला. भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ‘ईव्हीएम’ घोटाळ्यावर एक ग्रंथ लिहून ‘ईव्हीएम’विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भाजपाचे मुलुंडकर नागडे पोपटलालही ‘ईव्हीएम’ घोटाळ्यावर तेव्हा आंदोलन करीत होते, पण २०१४ साली सत्ता येताच या मंडळींनी ‘ईव्हीएम’ची पूजा व उत्सव सुरू केला”, असे म्हणत ठाकरे गटाने किरीट सोमय्यांनाही टोला लगावला आहे.
“मोदी-शहांना राज्यातील सत्तेत इंटरेस्ट नाही, पण लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा ‘खेला’ करून दिल्लीची सत्ता ताब्यात घ्यायची व त्या सत्तेच्या बळावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना टाचेखाली ठेवायचे. केंद्रीय तपास यंत्रणा, निवडणूक आयोग, न्याय यंत्रणा यांच्या माध्यमातून राज्याराज्यांत धुमाकूळ घालायचा हे त्यांचे सूत्र आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीका केली आहे.


