मुजफ्फरनगर ः
उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले. त्याच्या धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना त्याला मारण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करत तीव्र प्रतिक्रिया दिली.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. शिक्षिकेने वर्गात इतर मुलांना एका मुस्लीम मुलाला मारण्यास सांगितले आणि त्याचा अभिमान असल्याचे म्हटले. पीडित मुलाच्या वडिलांनी मुलाला शाळेतून काढून घेतले आणि लेखी दिले की, त्यांना कुणावरही कारवाई करायची नाही. वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांना न्यायाची कोणतीही आशा नाही आणि त्यांना वातावरण खराब होईल अशी भीती आहे.
“‘जो गुन्हा करेल त्याला ठोकणार’ असे योगी आदित्यनाथ यांचे धोरण आहे ना? मग आता पोलीस या शिक्षिकेला जाऊ देत आहे असं का? या मुलाबरोबर जे घडले त्याला योगी आदित्यनाथ आणि त्यांचे द्व्ोषपूर्ण विचार जबाबदार आहेत. कदाचित या गुन्हेगार शिक्षिकेला ते लखनौला बोलावून पुरस्कार देत सन्मान करतील”, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली.