साईमत, जळगाव : प्रतिनिधी
सिनियर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात जैन स्पोर्टस् ॲकडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण तर निलेश पाटील, रोहन लोणारी, हेमंत गायकवाड यांना रौप्य, महिलांमध्ये गौरी कुमावतला कांस्यपदक प्राप्त झाले. यामुळे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत जैन स्पोर्टस् ॲकॅडमीच्या खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे. तसेच आसामला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पुष्पक महाजनची निवड झाली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या सहकार्याने २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे ३३ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरूष व महिला तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचा संघ सहभागी झाला होता. त्यात पुरुषांच्या ८७ किलो आतील वजन गटात पुष्पक रमेश महाजन याने सुवर्ण पदक पटकावले. त्याने प्रथम फेरीत रत्नागिरी नंतर संभाजीनगर, सबमुबंई व अंतिम फेरीत ठाणेचा सनी कंक यांच्यावर मात करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. आसाम येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्टाच्या संघात स्थान निश्चित केले. त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
पुरूषांच्या इतर वजनी गटात ५४ किलो आतील निलेश पाटील, ६८ किलो आतील रोहन लोणारी, ८७ किलो वरील हेमंत गायकवाड यांनी रौप्यपदक पटकावले तर महिलांच्या ६७ किलो आतील वजन गटात गौरी कुमावत हिने कांस्यपदक पटकावले.
यांनी केले कौतुक
याबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जीवन महाजन रावेर, जयेश कासार, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत यांनी सर्व पदक विजेते खेळाडूंचे कौतुक केले आहे.
            


