साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी
जिल्ह्यासह शहरात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. दूध भेसळ विरोधी पथकाने नंदुरबार शहरात 18 ठिकाणी तपासणी केली. यामध्ये नऊ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने भेसळयुक्त 334 लिटर दूध नष्ट केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आणि शहरात भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारींची दखल घेत जिल्हा दुग्ध विकास आणि व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच नंदुरबार शहरातील विविध दूध विक्रेत्यांची तपासणी सुरू केली.या पथकाने 18 ठिकाणी तपासणी केल्यानंतर नऊ दूध विक्रेत्यांकडे दुधामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 334 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. काही ठिकाणी दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात ही मोहीम सुरूच राहणार असून दुधात भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी तपासणी करत असताना दुधात पाण्याचे प्रमाण जास्त दिसून आले ते दूध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लगेच जागेवर नष्ट केले आहे.दुसरीकडे मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्याने ग्रामीण भागातील काही दूध विक्रेत्यांनी शहरात न येणेच पसंत केले आहे. एकूणच जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाच्या विरोधात कारवाई सुरू झाल्याने भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही मोहीम जिल्हाभरात असे सुरू राहणार असल्याची माहिती दुग्धविकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली आहे.