साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जळगावसह ३६ जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील सर्व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशा आशयाची तक्रार ॲड. दीपक सपकाळे यांनी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे(बार्टी) महासंचालक, यांच्याकडे केली आहे. अशा तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही न केल्यास अर्जदार हे न्यायालयीन मार्गाचा अवलंब करतील, त्यामुळे तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातील (जळगाव सह) जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित केलेल्या आहेत. याठिकाणी मे. ब्रिक्स प्रा. लि. या खासगी कंपनीकडून समिती कार्यालयात बाह्यस्त्रोत कर्मचारी भरती मोठ्या संख्येने केलेली आहेत.
महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात या बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना रुजु होऊन ६ ते ७ वर्षे झालेली आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची स्थानिक पातळीवर सर्वांसोबत अतिशय चांगलेच हितसंबंध निर्माण झालेले आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गैरसोय व अनेक आर्थिक गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील जात पडताळणी समिती कार्यालयातील सर्व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची तात्काळ जवळच्या जिल्ह्यात बदली करण्यात यावी.
बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची बदली करण्याबाबत २०१९ यावर्षी महासंचालक यांनी आदेश दिलेले आहेत. परंतु त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून येत नाही. तसेच निबंधक यांनी २०२२ मधे बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत पत्र काढण्यात आले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. बाह्यस्त्रोत कर्मचारी पुरवठा धारक मे. ब्रिक्स प्रा. लि. कंपनी यांनीही महाराष्ट्रातील सर्व ३६ उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांना दिनांक २४ मे २०२२ या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, “बार्टी कार्यालयाच्या मा. नियामक मंडळाची बैठक (BOG ) क्र.२३ विषय क्र. ९ ८ फेब्रुवारीह २०१९ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला एका ठिकाणी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी ठेऊ नये, असे निर्देश दिले आहेत.”
प्रशासकीय कामकाजात निर्माण होताहेत अडचणी
तरी दीर्घ काळापासून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांवर बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यांच्या कामकाजाबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी लोक प्रतिनिधींनीकडून बार्टी कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून समित्यांकडील कार्यरत ज्या बाह्यस्त्रोत मनुष्यबळांना ३ वर्षापेक्षा अधिकचा कालावधी झालेला आहे. अशा मनुष्यबळांच्या बदली करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
समितीवर शिस्तभंगाची कारवाई करा
असे असतांना अद्याप महाराष्ट्रातील ३६ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कोणत्याही बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची बदली केलेली नाही. त्यामुळे महासंचालक व निबंधक यांच्या कार्यालयीन आदेशाचा भंग झालेला आहे, अवमान झालेला आहे. त्या अनुषंगाने सर्व ३६ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व तात्काळ बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची नजिकच्या जिल्ह्यात बदली करण्यात यावी, असेही तक्रारीत नमूद केले आहे.