चेन्नई :
पतीच्या अती शहाणपणामुळे त्याच्या गरोदर पत्नीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युट्युब पाहून पतीने पत्नीची घरची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला. पण यात पत्नीला अति रक्तस्त्राव झाला आणि तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चेन्नईतल्या पोचमपल्ली इथल्या पुलियामपट्टीची ही घटना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी राधिका यांनी याबाबत माहिती दिली. लोगनयाकी असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून ती २७ वर्षांची होती. लोगनायकी गरोदर होती. तिला प्रसवपिडा सुरु झाल्याने तिने पती मधेशला रुग्णालयता नेण्यास सांगितलं. पण मधेशने तिला रुग्णालयात न नेता घरातच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पत्नीने याला विरोध केला. पण मधेशने तिची एकही गोष्ट ऐकली नाही. यूट्युबच्या मदतीने मधेशने पत्नीची प्रसूत शस्त्रक्रिया सुरु केली. महिलेने एका मुलाला जन्म दिला. पण गर्भनाळ कापताना चूक झाली आणि यात तिला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. यामुळे ती बेशुद्ध पडली.
पत्नीची अवस्था पाहिल्यानंतर मधेश घाबरला आणि त्याने तात्काळ तिला प्राथमिक स्वास्थ केंद्रात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचाराआधीच लोगनायकीचा मृत्यू झाला होता. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी याबाबत विचारणा केल्यावर मधेशने सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला. डॉक्टरांनी तात्काळ पोलीस स्थानकात माहिती दिली.पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत एफआईआर दाखल केला आहे. पोलिसांचा तपासात मधेशने यूट्यूब पाहून डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.