मुंबई :
मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची जय्यत तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत इंडिया बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पुढील काळात राजकीय घडामोडीचे केंद्र मुंबई असेल असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातील विरोधी पक्षांची ‘इंडिया’ या नावाने आघाडी तयार करण्यात आली आहे. आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे, तर दुसरम्ी बंगळूरुत झाली, तिसरी बैठक मुंबईत होत आहे. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. देशातील सुमारे २६ हून अधिक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.