साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील निम येथे आई-वडिलांसोबत शेतात निंदणीसाठी गेलेल्या विवाहित तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील निम येथील वासुदेव रामसिंग पाटील उर्फ लोटण (वय ३३) हा आई वडिलांसह कळमसरे रस्त्यावरील शेतात निंदणीसाठी गेला होता. दुपारी त्याचे आई-वडील घरी आले. मात्र, तो निंदणीच्या कामासाठी शेतातच थांबून होता. साडेचार वाजले तरी वासुदेव घरी परतला नाही. म्हणून त्याची आई त्याला पाहण्यासाठी गेली. तेव्हा तो शेतातील झाडाखाली झोपलेला आढळून आला. त्याला उठविल्यावर तो उठत नसल्याने त्याला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून त्यास गाडीत टाकून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व पाच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. रणछोड पाटील यांच्या माहितीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पो.ना.मुकेश साळुंखे करीत आहेत.