साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी
गटग्रामपंचायत सोनबुद्रुकमार्फत आदिवासी गौरव दिनानिमित्त ग्रामसभेत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीने कन्यारत्न झालेल्या आई-वडिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गावातील विविध शासकीय पदावरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला. त्यात शिवलाल पावरा, ओजाऱ्या पावरा, निवृत्त शिक्षक पावरा, तलाठी भालचंद्र पावरा तसेच भारतभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावलेले माजी सैनिक डेका दादा पावरा यांनाही सन्मानित करण्यात आला. त्यानंतर गावपातळीवर विविध विभागांतील कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ज्यांनी २० वर्षांपासून ग्रामविकास विभागाचे उत्तम आणि आदर्श काम करणारे ग्रामसेवक गिरीश गोकुळ पाटील यांना आदर्श कर्मचारी आणि निरोप म्हणून आदिवासींचे प्रतीक म्हणून धनुष्यबाण, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रतिलाल पावरा, पशुधन अधिकारी डॉ. राजपाल पावरा, आंगणवाडीसेविका वंदना पावरा, एन. एम. खर्डे यांना आदर्श कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनादेखील आदर्श शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला. त्यात रमेश पावरा, रेल्या पावरा यांचा समाव्ोश आहे. गावातील विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावणारे विद्यार्थी यांचादेखील ग्रामपंचायतीमार्फत पदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात दिव्या पावरा, पिंटी पावरा, संदीप पावरा, योगेश पावरा, सुनील पटले यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली, तसेच एमबीबीएससाठी निवड झालेले हिंमत पावरा, पिंकीना पावरा यांचादेखील सन्मान करण्यात आला.त्यानंतर गावातील दहावी ते बारावी प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनादेखील गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शाळेत येण्यासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून ग्रामपंचायतीमार्फत दप्तरवाटप करण्यात आले. त्यानंतर गावात माझी वसुंधरा अभियान राबविण्याकरिता ग्रामसेवक अशोक पावरा यांनी मार्गदर्शन करून त्याची शपथ उपस्थित ग्रामस्थांना दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामसेवक अशोक पावरा, सरपंच जयश्री मगन पावरा, उपसरपंच बजरंग पावरा, नारसिंग पावरा, पोलिसपाटील मगन पावरा, मेरसिंग पावरा, ग्रामपंचायत कर्मचारी वीरसिंग पावरा, रोजगार सेवक व इतर सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच कृषी सहाय्यक राकेश पावरा, वनपाल पावरा, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच आदिवासी जनजागृती टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.