साईमत, मुंबई : प्रतिनिधी
वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील गटात सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाच्या कार्यालयाकडून उद्या मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर नवाब मलिक घरी परतले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आदींचा समाव्ोश होता. तर, शरद पवार गटांकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे आदी नेत्यांचा समाव्ोश होता. त्यामुळे नवाब मलिक यांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही गटाचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती. उद्या, मंगळवारी, २२ ऑगस्ट रोजी अजित पवार गटाकडून विश्वजीत देशपांडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
