मनोहर कुलकर्णींना ‘संभाजी’ नाव लावण्याची आवश्यकता का भासली?

0
66

मुंबई ः प्रतिनिधी

ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका सुरू झाली आहे. या टीकेनंतर छगन भुजबळ आज (२० ऑगस्ट) स्पष्टीकरण देण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी कुठल्याही समजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही असे भुजबळ म्हणाले. तसेच त्यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र सोडले तसेच काही प्रश्नही उपस्थित केले.

महापुरुषांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक झाल्याशिवाय ते सरळ होणार नाहीत. भिडे यांना कोणीही पाठीशी घालू नये. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रात गोंधळ होईल,असा इशारा छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी भिडे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही हे आधी स्पष्ट करा. किंवा ते मनोहर कुलकर्णी नाहीत असं स्पष्ट करा. ते मनोहर कुलकर्णी आहेत तर मग त्यांना संभाजी हे नाव लावण्याची आवश्यकता का भासली?

छगन भुजबळ म्हणाले, मनोहर कुलकर्णी यांनी त्यांच्या खऱ्या नावाने प्रबोधन करावे परंतु, हे नाव (संभाजी) घ्यायचं आणि बहुजन समाजात जायचं, ते काही बरोबर नाही. म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहोत. संभाजी हे नाव लावून ते काय बोलतात? तर माझे आंबे खा मग मुलं होतील, अमुक-तमुक बोलणं सुरूच असतं. असे असेल तर त्याला आम्ही विरोध करणार.

संभाजी भिडे यांनी अलिकडेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा गांधी यांच्या वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात निषेध नोंदवण्यात आला, आंदोलनेही झाली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली तसेच त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात अनेक ठिकाणी उमटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here