साईमत, शेंदुर्णी, ता.जामनेर : वार्ताहर
येथील नगरपंचायतीकडून २०२२/२३ चे मालमत्ता करात २० टक्के करवाढ करण्यात आली आहे. कर विभागाकडून वसुली केली जात आहे. तसेच २०२३ ते २०२६ या पुढील ४ वर्षाकरीता नगर रचना विभाग मूल्यांकन अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडून प्रचंड करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. शेंदुर्णी नगरपंचायतने लागू केलेल्या व प्रस्तावित करवाढी विरोधात शेंदुर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना(उबाठा), भा.राष्ट्रीय काँग्रेस मित्रपक्ष महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे.
मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून गोंधळपुरा, पारस पतसंस्था चौक, महावीर मार्गाने नगरपंचायत कार्यालयावर नेऊन करवाढ रद्द करणे व करवाढीवर हरकती घेण्यासाठी कराची थकबाकी भरण्याची अट रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शहर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी मित्र पक्षाच्यावतीने केले आहे.
करवाढीस कडाडून विरोध
शेंदुर्णी नगरपंचायतने २०२२/२३ मध्ये शहर बृहत आराखडा जाहीर करून गाव हद्दीजवळील २ किलोमीटर अंतरावरील शेत जमिनींवर आरक्षणे टाकली होती. मालमत्ता करांमध्येही २० टक्के करवाढ केली होती. तेव्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तर शेंदुर्णी शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी मोर्चे काढून शहर बृहत आराखडा व करवाढीस कडाडून विरोध केला होता. तेव्हा नगरपंचायत पदाधिकारी यांच्यातर्फे भाजपाचे नेते गोविंद अग्रवाल यांनी २०२४ पर्यंत बृहत आराखडा मंजुरी व करवाढ करण्यात येणार नसल्याचे मोर्चेकरी नागरिकांना आश्वासन दिले होते. तरीही मालमत्ता करात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नगरपंचायत करवाढविषयी प्रचंड असंतोष निर्माण पसरला आहे.