
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील नारायणवाडीतील रहिवासी सागर बबनराव नागणे यांच्याबद्दल चाळीसगावमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. पंचायत समितीत शहीद जवानांच्या नावे असलेल्या कोनशिलात चक्क जिवंत शेतकऱ्याचा शहीद जवान म्हणून उल्लेख केला आहे. या कोनशिलाचे १५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. शहीद जवानांसाठी बनविण्यात आलेल्या कोनशिलात आपले नाव पाहून सागर नागणे यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात पंचायत समितीच्या प्रशासनाला जाब विचारल्यावर त्यांनी या प्रकरणात कुठलीही माहिती न देता या कोनशिलावरून शेतकऱ्याचे नाव हटविले आहे. गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर संपर्क होऊ शकला नाही. यासंदर्भात कार्यालयातील शिपायाने ते ग्रामीण भागात गेले असल्याचे सांगितले. शेतकरी सागर नागणे हे शिक्षित असून ते जळगाव नेहरू युवा केंद्राचे माजी समन्वयक आहेत. त्यांची चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे शेती आहे.


