साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
गेल्या १७-१८ वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरपंच अक्षय जैस्वाल यांनी वार्ड क्रमांक ४ मधील मागासवर्गीय वस्तीचा निधी वस्तीत वापर न करता इतरत्र खर्च दाखवून जाणीवपूर्वक शासनाच्या १५ टक्के मागासवर्गीय ग्राम निधी व दलित वस्तीच्या निधींपासून मागासवर्गीयांना वंचित ठेवले आहे, अशा आशयाच्या तक्रारीचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खरे, विजय बाविस्कर यांनी जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. पदाचा गैरवापर करणाऱ्या सरपंच जैस्वाल याच्यावर कारवाई करावी आणि विकासकामांबाबत न्याय न मिळाल्यास मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे.
वार्डातील पुरुष-महिला यांनी मागासवर्गीय वस्तीत १५ टक्के मागासवर्गीय ग्रामनिधी व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विकासकामे करावीत, या मागणीचा लेखी अर्ज फेब्रुवारी २०२३ मध्ये दिला होता. मात्र, अर्जालाही सरपंच जैस्वाल यांनी ‘केराची टोपली’ दाखवत १५ वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच यापूर्वी अनेकदा तोंडी व लेखी अर्ज देऊनही मागासवर्गीय वस्तीत ग्रामपंचायत प्रशासनाने विकासकामे केली नसल्याने ३१ जुलै रोजी विकास कामांबाबत सरपंच यांना स्मरण देण्यासाठी वार्डातील नागरिक भेटले होते. तेव्हा सरपंचांनी बेजबाबदारपणे वक्तव्य केले की, ‘तुमचे विकास कामे करण्यास मी बांधील नसून तुमच्याकडून जे होईल ते करा’, ‘माझी तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करा, मला काही फरक पडत नाही’, अशाप्रकारे मागासवर्गीय नागरिकांना वागणूक मिळत आहे. एकीकडे शासन मागासवर्गीय वस्ती सुशोभीकरण व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. लोहारा गावात सुविधा व विकासकामांपासून वंचित ठेवले जात आहे.
वरिष्ठांनी वस्तीत येऊन सत्य परिस्थिती बघा
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मागासवर्गीय वस्तीत येऊन सत्य परिस्थिती बघावी. आम्हाला न्याय द्यावा आणि सरपंच यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील खरे, विजय बाविस्कर यांनी वरिष्ठांना निवेदनाद्वारे कळविले आहे.