साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल ॲड ज्यू. कॉलेजचे माजी संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे वडील व कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील यांचे आजोबा स्व.नवलभाऊ आनंदा पाटील यांची ११६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षक युवराज पाटील, शालेय सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शरद पाटील होते. सर्वप्रथम मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धचंद्रकृती पुतळ्याला व स्व.क्रांतिवीर नवलभाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. त्यानंतर प्रमुख वक्ते युवराज पाटील यांनी नवलभाऊंचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला.
साने गुरुजींचा लाभला सहवास
यावेळी शरद पाटील म्हणाले की, क्रांतिवीर स्व.नवलभाऊ यांचे स्वातंत्र्यातील योगदान लक्षणीय आहे. साने गुरुजींचा सहवासही त्यांना लाभलेला आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पी.एम.कोळी म्हणाले की, क्रांतिवीर स्व.नवलभाऊ यांचा वारसा समर्थपणे पेलण्याचे काम नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब विजय नवल पाटील आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब अनिकेत पाटील समर्थपणे पेलत आहेत.
सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक बी.डी.पाटील तर विज्ञान शिक्षक संजय पाटील यांनी आभार मानले.