साईमत, जळगाव : प्रतिनिधी
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रदर्शन भरवून जयंती साजरी करण्यात आली. पुस्तक प्रदर्शनात शालेय पुस्तके, अवांतर पुस्तके, व्युत्पत्ती कोश, संत चरित्र आदी पुस्तकांचा समावेश होता. प्रदर्शनाचा पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांंनी लाभ घेतला. याप्रसंगी प्रथम डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका वैजापूरकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले सर्व पाहुण्यांचे स्वागत ग्रंथालय समितीच्या श्रीमती एस.आर.बेहडे यांनी केले.
ग्रंथालय समिती प्रमुख शाळेचे ग्रंथपाल ऋषिकेश जोशी यांनी डॉ.रंगनाथन यांच्या जीवनाचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. ग्रंथालय समितीचे अशोक पारधे यांनी वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. व्यासपीठावर मुख्याध्यापिका वैजापूरकर, पर्यवेक्षक एस. पी.निकम, शाळेच्या शिक्षिका संगीता पाटील आदी उपस्थित होते. प्रदर्शनामुळे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व कळावे, हाच मुख्य उद्देश होता. यशस्वीतेसाठी अलका पितृभक्त यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.