साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील लोंढ्री शिवारातील कपाशीच्या शेतात पहूर येथील अविवाहित तरुणाचा इलेक्ट्रिक विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील पहुर पेठमधील आंबेडकर नगर येथील रहिवाशी आनंदा सांडू मोरे यांचा मुलगा समाधान आनंदा मोरे (वय ३४) लोंढ्री शिवारात बेलाचे पाने तोडण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत असलेली त्याची मोठी बहीण आशा मोरे तसेच चुलत बहीण सारिका मोरे, शैला घोडेस्वार हे तीनही जण नेहमीप्रमाणे बेलाचे पान तोडण्यासाठी जात होते. तेव्हा वाटेत कपाशीच्या शेतात इलेक्ट्रिकची तार तुटलेली होती. त्या तारावर आशा मोरे यांचा पाय पडला. त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या समाधानने इलेक्ट्रिकची तार हातामध्ये पकडल्याने त्याला विजेचा जोरदार शॉक बसला. त्यात जागीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रोजी सकाळी घडली.
पहुरला शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मयत समाधानला पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. समाधानचे शवविच्छेदन करून पहुर येथे रात्री शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. समाधानच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.