फैजपूर ता यावल : प्रतिनिधी
जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश असूनही फैजपुर शहरात अनेक दुकाने हाफ शटर बंद करून सुरू असल्यामुळे फैजपूर नगरपालिकेने सोमवार दि. ३ रोजी येथील तीन मोठ्या कापड दुकानावर कारवाई करून सील ठोकले.
काल झालेली कारवाई ताजी असतानाच आज सकाळी त्यातील खुशाल भाऊ रोडवर असलेल्या दुकानात चक्क बाजूच्या दरवाजातून गिर्हाईकांना आत सोडून कपड्यांची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या. त्या दुकानदाराचे असे कृत्य दोन पैशांच्या लालसेपोटी नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
काल मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल साळुंखे यांच्या पथकातील सुनील नंदाने, सुधिर चौधरी अनिकेत साळुंखे, आकाश यांनी केलेल्या कार्यवाहीत फैजपूर शहरातील अक्षदा कलेक्शन, राजकमल गारमेंट्स तसेच इंडिया रेडीमेड या तीन दुकानांवर कारवाई करून त्यांना सील ठोकण्यात आले. मात्र अशा कडक कारवाईलाही दुकानदार मानत नसल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग व दुकानदारांकडून नियमांची ऐसी की तैसी या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने कडक उपाययोजना व कारवाई करून नियम मोडणार्यावर गुन्हे दाखल करण्याचे ठरविले आहे. सर्वांच्या भल्यासाठी व्यावसायिक तथा नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एपीआय प्रकाश वानखडे यांनी केले आहे.
