नवीदिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्यत्व परत मिळाल्यानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा हल्लाबोल केला मात्र, या भाषणापेक्षा त्यांनी लोकसभेतून जाताना केलेल्या एका कृतीची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी सत्ताधारी बाकांकडे बघून ‘फ्लाइंग किस’ दिल्याचा दावा मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. त्यानंतर भाजपाच्या २२ महिला खासदारांनी याविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिले आहे मात्र, राहुल गाधींच्या त्या कृतीचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे.
नेमके काय घडले लोकसभेत?
लोकसभेत राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर भाषण झाल्यानंतर सत्ताधारी बाकांवरून होणाऱ्या टीका-टिप्पणीवर राहुल गांधींनी फ्लाइंग किस देणारे हावभाव केले.यावरून सध्या भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
राहुल गांधींनी केलेली कृती आक्षेपार्ह आणि संसदीय वर्तनाला न शोभणारी असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष राहुल गांधींच्या पाठिशी उभे राहिले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या या कृतीचं समर्थन केले आहे.
जादू की झप्पी तसे जादू का फ्लाइंग किस!
“भाजपा कधी कोणत्या गोष्टीचे प्रदर्शन राजकारण करेल हे सांगता येत नाही. जंतरमंतरला महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या होत्या तेव्हा कुणी तिथे गेले नव्हते. राहुल गांधींनी द्व्ेष, सूड यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला.जादू की झप्पी म्हणतो तसं जादू का फ्लाइंग किस.या ‘मोहोब्बत की दुकान’मधले ते एक महत्त्वाचे शस्त्र आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी असे अनेक फ्लाइंग किस जनतेला,देशाला दिले आहेत पण ज्यांना ममत्व उरलेले नाही, त्यांना फ्लाइंग किस म्हणजे काय हे समजणार नाही, असे म्हणत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.