साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही उत्तर महाराष्ट्रात एक अग्रगण्य अशी नावाजलेली बाजार समिती आहे. तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली, खिल्लारी बैलांसाठी तसेच भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ म्हणून चाळीसगाव बाजार समिती प्रसिद्ध आहे. आज चाळीसगाव बाजार समितीमध्ये चालू हंगामातील मूग विक्रीसाठी आला होता. माळशेवगे येथील प्रगतीशील शेतकरी, बाजार समितीचे माजी संचालक प्रवीण महारू पाटील यांचा मूग हा शेतीमाल शांताराम दामोदर ॲन्ड कंपनीमध्ये सर्वात उच्चांकी ८ हजार ६५१ रूपये दराने विक्री झाला.
यापाठोपाठ सुरेश ट्रेडिंग कंपनीमध्ये शेतकरी धनराज हरी चव्हाण, वलठाण यांचा मूग हा शेतीमाल ८ हजार १८१ रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.
चाळीसगाव बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल जास्तीत जास्त शेतकऱ्यांंनी विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड यांच्यासह नूतन संचालक मंडळाने केले आहे. लिलावावेळी बाजार समितीचे सचिव जगदिश लोधे, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, बाजार समितीचे माजी संचालक जितेंद्र वाणी, प्रवीण पाटील, बाजार समितीचे वरिष्ठ लिपीक संजय जाधव, व्यापारी सुरेश वाणी, हेमंत वाणी, राजेंद्र मांडे, राकेश छाजेड, अमेय येवले, प्रवीण बागड आदी उपस्थित होते.
