साईमत, पुणे : प्रतिनिधी
कै विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड येथे आयोजित केलेल्या ५७ व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या रहिम खानला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १५-२५, २५-१२, २३-१६ असे हरवून अंतिम विजेतेपद पटकाविले तर महिलांच्या एकेरीत अंतिम फेरीत मुंबईच्या अंबिका हरिथने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला १५-१३, ०-२५, २५-५ असे तीन सेटमध्ये पराभूत करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमदने मुंबईच्या प्रफुल मोरेवर २३-१७, २१-६ अशी मात केली. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या काजल कुमारीने मुंबईच्या सिमरन शिंदेंवर २५-६, २५-१९ असा विजय मिळविला होता. विजेत्यांना सनी वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले.
सनी निम्हण यांनी प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्यात राज्य मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्याची ईच्छा व्यक्त केली. तर असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी त्यांच्या या प्रस्तावास होकार दिला.या प्रसंगी अखिल भारतीय सायकलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भारत देसडला, मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मंजूर अहमद खान, खजिनदार अजित सावंत, सहसचिव अभिजित मोहिते व योगेश फणसळकर, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे कार्याध्यक्ष आशुतोष धोडमिसे, सचिव नंदू सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत देसडला यांनी प्रथमच पुण्यात आयोजित केलेल्या या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सनी निम्हण यांंचे आभार मानले. प्रताप जाधव यांनी सनी वर्ल्ड तर्फेे आयोजित करण्यात आलेल्या कॅरम व्यतिरिक्त इतर स्पर्धांची माहिती दिली तर अभिजित मोहिते यांनी स्पर्धेचे सूत्र संचालन केले.