जामनेरला शोकसभेत ‘दादां’च्या आठवणींना मिळाला उजाळा

0
11

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात शोकसभा घेवून रानकवी कवीवर्य ना.धों.महानोर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.डी.पाटील होते. याप्रसंगी मंचावर न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी.एन. नरवाडे, पर्यवेक्षक पी.एम.पाटील, आर.डी.येवले होते.

शोकसभेत श्रीमती पी.एन.नरवाडे यांनी आपले वडील आणि कवी महानोर हे शेंदुर्णी शाळेत शिकत असताना वर्गमित्र असल्याचे सांगितले. तसेच दादांच्या अनेक कवितांचा त्यांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला.

शोकसभेत मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी मनोगतात दादांचे साहित्य मंडळावर अतिशय प्रेम होते. मंडळाने आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यात दादांचा मोठा हातभार व सहकार्य केले होते. दादांचे पळासखेडा हे गाव मराठवाड्याच्या आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने त्यांचे जळगाव जिल्हा आणि विशेषता जामनेर तालुक्यात जवळचे संबंध होते. मी सुद्धा भिलखेडा या खेडेगावातीलच असल्याने दादांच्या साहित्याचा माझ्याही कविता लेखनामध्ये प्रभाव पडला आहे. माझ्या एका कवितेमध्ये त्याचा उल्लेख आहे तो असा, ‘राजा महाजन गुरु त्याचा महानोर चेला… मज कवणाचा मंत्र, त्या दोघांनीच दिला…’ अशी आठवण सांगितली. महानोर यांच्या जाण्याने साहित्य मंडळ आता पोरके झाले असल्याचे सांगून दादांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

यांची होती उपस्थिती
शोकसभेला मंडळाचे सचिव गोरख सूर्यवंशी, सहसचिव जितेंद्र गोरे, कोषाध्यक्ष सुखदेव महाजन, आर.डी.येवले, एस.पी.सोनवणे, यु.एम.माळी, डी.एस.पाटील, उंबरकर सर, पी.जी. मंजा, व्ही.पी.पाटील, एस.एस.सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here