जळगावच्या दोघा सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

0
22

साईमत, जळगाव, प्रतिनिधी

शहरातील पिंप्राळा व नशिराबाद येथील दोघा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अलीकडच्या काळात सराईत गुन्हेगारांना हद्दपार अथवा एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्याला गती दिलेली आहे. अलीकडेच याबाबतच्या कार्यवाही मोठ्या स्वरूपात होतांना दिसून येत आहेत. यात आता नव्याने भर पडली असून यात जळगाव आणि नशिराबाद येथील दोन गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

शहरातील पिंप्राळा परिसरातला रहिवासी फैजल खान अस्लम खान पठाण ( वय 22) आणि नशिराबादच्या ख्वाजा नगरातील रहिवासी शेख शोएब शेख गुलाम नबी ( वय 27) या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. यात फैजल खानविरोधात जळगाव एमआयडीसी, धरणगाव आणि जळगाव तालुका पोलिसात गुन्हे आहेत. तर शेख शोएबच्या विरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्हेगारांपासून समाजाला धोका असल्याने त्यांना हद्दपार करण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. या अनुषंगाने प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी या संदर्भात सुनावणी घेतली. यानंतर या दोन्ही गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. सोमवारीच त्यांना दोन दिवसांमध्ये जळगाव जिल्हा सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here