साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील राष्ट्रीय विद्यालय येथे सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्रातील तिसरे सार्वजनिक सत्यधर्मीय प्रबोधन शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदीप पाटील, पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. डी. चौधरी, ह.भ.प. सत्यशोधक भगवान माळी गुरुजी आदी उपस्थित होते.
सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते साळूबा पांडव, भगवान रोकडे, भगवान बोरसे यांनी सार्वजनिक सत्यधर्म विधीकर्ते निर्माण करण्यासाठीचे प्रशिक्षण विस्तृतपणे दिले. यामध्ये सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह सोहळा, हळदी समारंभ, सत्य पूजा, गृहप्रवेश, दशक्रिया विधी आदी विधींचे कृतीयुक्त प्रशिक्षण दिले. शिबिराला नाशिक येथील राजेंद्र निकम, भालचंद्र महाजन, वाघळी येथील राजेंद्र माळी, वाडे येथील देविदास महाजन, पातोंडे येथील रिद्धी रोकडे यांचा समावेश होता.
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मान
सत्यशोधक समाज संघाच्यावतीने सर्व प्रशिक्षणार्थींना सत्यशोधक विधी पुस्तक, सहभाग प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यशस्वीतेसाठी सत्यशोधक कैलास भगवान जाधव, भगवान रोकडे, शिवदास महाजन आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पी.डी.पाटील तर विजय लुल्हे यांनी आभार मानले.