साईमत मुंबईः प्रतिनिधी
मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. याविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावली झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती दिली आहे. यापेक्षा कमी शिक्षा सुनावता आली असती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पुन्हा एकदा लोकसभेत दिसतील असे बोलले जात होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन 72 तास होत आले तरी अद्याप लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना त्यांचं संसद सदस्यत्व दिलेले नाही. यावरून आता टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून आता थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले, सुरत न्यायालयाच्या निकालानंतर अवघ्या 24 तासांमध्ये लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती परंतु सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 72 तास उलटले तरी त्यांनी राहुल गांधी यांना संसदेत परत घेतलेले नाही. लोकसभा अध्यक्ष म्हणत आहेत की, आम्ही यावर अभ्यास करू. मग सुरतच्या न्यायालयाने निकाल दिला त्याव्ोळी अभ्यास का नाही केला?
खासदार संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायलयाने गुजरात न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली दिली आहे. त्याचबरोबर गुजरात आणि सुरत न्यायालयाला खडे बोल सुनावले आहेत. तरीदेखील आतापर्यंत लोकसभा अध्यक्षांनी याप्रकरणी काहीच केलेलं नाही. कारण हे सरकार राहुल गांधींना घाबरतेय. संजय राऊत म्हणाले, सुरत न्यायालयाने निर्णय दिल्यावर लगेचच लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले तेव्हा इतकी घाई करण्याची काय गरज होती? आता सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, तर हे (लोकसभा अध्यक्ष) म्हणतायत की, आम्ही अभ्यास करतोय. पीएचडी करताय का त्यावर? डॉक्टरेट मिळवणार आहात का?