पणजी : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरु फादर बोलमेक्स परेरांविरोधात गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोलमेक्स परेरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी वास्को पोलीस ठाण्याबाहेर राजपूत करणीसेना, बजरंग दल यांसह सुमारे १०० शिवप्रेमींनी गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. फादर बोलमेक्स परेरा हे दक्षिण गोव्यातली सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्चचे फादर आहेत.
किरण नाईक मुरगाव येथील इतर गावकरी यांनी फादर परेरा यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली. फादर परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते असे या सगळ्यांनी तक्रारीत म्हटले आहे.एका वृत्तसंस्थेने या विषयीचे वृत्त दिले आहे.
तक्रारीमध्ये असेही म्हटले आहे की, फादर परेरा यांनी जाणीवपूर्वक आपल्या प्रवचनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त टिपण्णी करुन भावना भडकवण्याचाच त्यांचा उद्देश होता. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहेत. आम्हा शिवप्रेमींच्या भावना या व्हिडीओमुळे दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर फादर बोलमेक्स परेरा यांनी खेद व्यक्त करत माझ्या प्रवचनातला काही भाग निवडकपणे समोर आणला गेला असे म्हटले आहे. मी असेही म्हटले होते की, राष्ट्रपुरुषांमध्ये छत्रपती शिवरायांची गणना होते तसेच शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व जात, धर्म, पंथ, भाषा यांच्यापलिकडचे आहे. विदेशातील लोकांनाही ते आदरणीय आहेत, असेही फादर परेरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल झाली. दरम्यान, शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांनी आता फादर विरोधात गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करत वास्को पोलीस स्टेशन बाहेर गर्दी करून निदर्शने सुरू केली होती.
काय आहे प्रकरण?
एका कथित व्हिडीओ क्लिपनुसार फादर बोलमेक्स परेररा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. “असे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी शिवाजी महाराज हे दैवत आहेत. मला वाटते की,शिवाजी महाराज हे राष्ट्रीय नायक आहेत,आपण त्यांचा योग्य आदर आणि सन्मान केलाच पाहिजे मात्र ते देव किंवा दैवत नाही.यासाठी हिंदू बांधवांशी संवाद साधला पाहिजे आणि शिवाजी तुमचा देव आहे की, राष्ट्रीय नायकाच्या रुपात तुम्ही त्याला पाहता? हे विचारले पाहिजे. जर राष्ट्रपुरुष म्हणून तुम्ही शिवरायांकडे पाहात असाल तर त्याला दैवत कसं काय म्हणणार?” या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे.