साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळ ट्रकला ओव्हरटेक करतांना आयशरने समोरून येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली. त्यात २ जण जागीच ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहे. ज्या ट्रकला ओव्हरटेक केले तोही रस्त्याच्या खाली जाऊन उलटला होता. हा अपघात शुक्रवारी, ४ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, पहुरकडून जामनेरकडे आयशर गाडी ( क्र.एम.एच.१५ एफ.व्ही.५४६७ ) भरधाव वेगाने जात असतांना ट्रकला ( क्र.टी.एन.२८, बी.डी.२८-७१६६ ) ओव्हरटेक करतांना जामनेरकडून पहुरकडे येणाऱ्या आयशर गाडीला (क्र. एम.एच.०९ई.एम.६६९४) समोरून धडक दिली. त्यात रतन तुकाराम चव्हाण ( वय २७, रा.आगर शिरोळ, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर ) आणि तुकाराम महादेव लढ्ढे ( वय ३२, रा.बेघर वसाहत शिरोळ, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर ) यांच्या मृत्यूस आणि तिन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला. याप्रकरणी राजाराम भाउसो चव्हाण (वय ४०, रा. आगर शिरोळ, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) यांनी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोन जखमींना मिळाले ‘जीवदान’
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने एकमेकांना धडकल्यामुळे चिकटलेले वाहने रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील गंभीर जखमी इमरान खान ( वय १८ ) आणि अफसर खान ( वय १९, रा.भोपाळ, म.प्र.) यांना पहुर येथील १०८ रुग्ण वाहिकेतून पायलट असलम शेख आणि डॉ.एजाज शेख यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे त्यांना ‘जीवदान’ मिळाले आहे. तपास सहा. फौजदार भरत लिंगायत, रवींद्र देशमुख करीत आहे.