साईमत अक्कलकुवा प्रतिनिधी
तालुक्यातील रामपूर घरकुल घोटाळ्यातील दोषींवर अद्याप पर्यंत कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आज रामपूर येथील असंख्य ग्रामस्थ व तालुक्यातील ग्रामस्थ व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकुवा तहसील कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रामपूर घरकुल घोटाळ्याची चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ गेल्या तीन वर्षापासून सातत्याने करीत होते त्या अनुषंगाने अक्कलकुवा पंचायत समिती मार्फत चौकशीचा फार्स दाखविण्यात आला मात्र चौकशीत निष्पन्न झालेल्या दोषींवर कारवाई करण्यास पंचायत समिती तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने चार मुळ लाभार्थ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या वारसदारांनी केला त्यामुळे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच घरकुल घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थ आग्रही होते.मात्र याची प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तरी देखील प्रशासनाने योग्य ती दखल घेतली तहसिल कार्यालया समोर शेकडोंच्या संख्येने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता सुरु झालेले रस्ता रोको आंदोलन सुमारे 3 वाजेला संपले. भर पावसात भिजत आंदोलनकर्त्यांनी सुमारे चार तासा पेक्षा जास्त वेळ आंदोलन केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार रामजी राठोड, गट विकास अधिकारी लालू पावरा, पोलीस निरीक्षक राहुल पवार आदींनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली.मात्र आंदोलनकर्ते दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने येत्या 15 दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सर्व दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देत तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, व रोजगार सेवक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमश्या पाडवी, रामपूरचे सरपंच अबेसिंग पाडवी, माजी सरपंच कुवरसिंग पाडवी, तापसिंग पाडवी, एकता परिषदेचे किसन महाराज, आदिवासी महासंघाचे हिरामण पाडवी, शेतकरी सह संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, शिवसेनेचे तालुका प्रमुख मगन वसावे,उप जिल्हा प्रमुख मंगलसिंग वळवी, विनोद वळवी, उप प्रमुख तुकाराम वळवी, टेडग्या वसावे, काना नाईक, रावेंद्रसिंह चंदेल,निलेश वसावे, अशोक पाडवी, आनंद वसावे, रवी पाडवी, प्रकाश पाडवी, ललित जाट, नटवर पाडवी,नासीर बलोच आदिंसह रामपूर येथील अनेक मूळ लाभार्थी उपस्थित होते.