जळगाव: विशेष प्रतिनिधी
सद्य स्थितीत कोरोनाचा भयंकर प्रकोप सुरू आहे .जळगाव जिल्ह्याचीच स्थिती पाहता रोजची रुग्ण संख्या हजाराच्या पुढेच असून मृत्यू दर सुद्धा वाढलेला दिसून येतो .ह्या कोरोना महामारी ची दुसरी लाट पहिल्या पेक्षा जास्तच भयंकर असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून ते रास्तच असल्याचे आपण पहात आहोत .या आजाराबद्दल अनेक रुग्णांच्या मनात विनाकारण धास्ती असते आणि त्यामुळे ते घाबरलेले असतात ,‘‘आपणास कोरोना झाला ,आता आपले काही खरे नाही‘‘ अशीच भीती काहींच्या मनात घर करते व त्यातूनच अनर्थ घडल्याची उदाहरणे आहेत. वास्तवात कोरोना आपल्या घरात कसा आला ? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे .कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याचा संसर्ग आपणच ओढवून घेत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.
त्याच्या प्रसार व संसर्गास आपण स्वतःच जबाबदार आहोत .याची दखल किंबहुना खबरदारी घेतली तर सारे काही आटोक्यात येऊ शकते .
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी गेल्यावेळी स्पष्टीकरण केले होते की,शासकीय कोविड रुग्णालयात गंभीर व अति गंभीर रुग्णांनाच दाखल केले जाते ,त्यांच्या उपचारास पुरेसा वेळ मिळत नाही आणि बर्याच रुग्णांचे मृत्यू हे ७२ तासांच्या आत झालेले आहेत .
त्यांचे म्हणणे खरेच म्हणावे .कारण आपण स्वतः किंवा अनेक लोक कोणताही किरकोळ आजार,दुखापत ,व्याधी झाली तर वरचेवर उपचार करण्यावर भर देतात हे खरेच आहे .शहरातील एक प्रसिद्ध एम डी. डॉक्टर वियांश यांच्याशी वार्तालाप करतांना त्यांनी
सांगितले की, कोरोनाची लक्षणे फ्ल्यू , मलेरिया अथवा टायफाईड सारखी असू शकतात .पण सध्याचा काळ वरचेवर उपचार करण्यासारखा मुळीच नाही.आपले फॅमिली डॉक्टर किंवा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केले पाहिजे .सर्दी आणि खोकला आला म्हणजे आपल्याला कोरोनानेच ग्रासले असे मुळीच नाही .तर वेळीच उपचार केले तर व्याधी वाढणार नाही अर्थात व्याधी नियंत्रणात येईल व उपचार न केल्यास व दखल न घेतल्यास त्याचा कोरोना होण्यास वेळ लागणार नाही असेही डॉ.वियांश म्हणाले.
राज्य शासनाने गेल्यावेळी कोरोनाच्या पहिल्या लाटेत माझे कुटुंब माझी जबाबदारी‘‘ही घोषणा मांडली होती .ती स्वागतार्ह होतीच .आपल्या घरात आलेल्या आजारास आपण दुसर्याला जबाबदार धरू शकत नाही .जसे डोळ्यांची साथ आली असता सर्वत्र डोळे लाल होणे, डोळ्यांची आग,डोळ्यातुन पाणी येणे अशी माणसे दिसतात .तो सुद्धा संसर्गजन्य आजार आहे. आपण बाहेर जातो, कोणतीच दक्षता घेत नाही आणि त्यामुळे तो आजार घरात आणतो .मग घरातील सर्यांच्याच क्रमाक्रमाने डोळे येतात .ही परिस्थिती आहे .
शासन, प्रशासन प्रत्येकाच्या मागे फिरणार नाही.जसे पोलीस प्रत्येक व्यक्तीच्या मागे फिरू शकत नाहीत .कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा वाढत गेला शासनाने प्रत्येक वेळी निर्बंध,कडक निर्बंध आणि शेवटी लॉक डाऊन घोषित केले होते.त्याची झळ तळा गळातील सर्वानाच बसली आहे .गेल्यावेळी हातावर पोट भरणारंपासून तर लहानमोठे व्यवसायिक ,उद्योजक सर्यांच्याचे अर्थचक्र बिघडले होते .मार्च ते सप्टेंबर २०२० असा तो कठीण काळ होता .त्यांनतर कोरोनावर नियंत्रण आल्यावर सारे हळूहळू सुरळीत होत असं तांना आणि गाडी रुळावर येत असतानाच फेब्रुवारी पासून पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे .त्यामुळे पुन्हा निर्बंध ,कठोर निर्बंध ,ब्रेक दी चेन आणि लॉक डाऊन ची स्थिती निर्माण झाली आहे .म्हणजे पुन्हा अर्थचक्र बिघडत चालले आहे .
त्यासाठी शासन, प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही .सार्यांनीच जर ‘‘माझे कुटुंब माझी जबादारी‘‘ याप्रमाणे जबाबदारी घेतली तरच कोरोना नियंत्रणात येणार हे निश्चित म्हटले जाते .त्यामुळे आपण गर्दीत जाणे व गर्दी करणे टाळले पाहिजे ,मास्क नाक व तोंडावर असलाच पाहिजे तो हनुवटीवर खाली आणलेला नको.विवाह सोहळे व समारंभ आदी ठिकाणी आज तरी गर्दी नको .ठराविक उपस्थितीत व मास्क वैगैरे नियम पाळून सोहळे केले तर संसर्ग होणार नाही .
बाजारपेठ म्हटली म्हणजे गर्दी आली .तेथे जाणे टाळले पाहिजे व जावे लागलेच तर सोशल डिस्टनसिंग ,मास्क हे नियम पाळलेच पाहिजेत व्यापारी वर्गाने मग तो किराणा दुकानदार असो,कापड विक्रेते असोत की दाणा बाजारातील दुकानदार त्यांनी गर्दी होणे व आपल्या दुकानात ग्राहकांना नियमानुसार प्रवेश देणे हा नियम पाळला पाहिजे .एकाचवेळी अनेक ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये .या गोष्टी पाळल्या तरच कोरोना नियंत्रणात येईल अन्यथा दुकाने .रस्ते बंद करावेच लागणार आहेत .
दुसरीकडे कोरोना बद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .तशी धास्ती सुद्धा असल्याचे दिसून येते .जिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितले होते ,सर्पदंश झालेले बरेच लोक सर्पदंश झाला म्हणून मरण पावत नाहीत .कारण सारेच सर्प विषारी नसतात. पण आपल्याला साप चावला ,आपले काही खरे नाही ही भीती मनात बसते आणि हृदय विकाराच्या झटक्याने काही लोक मरण पावतात.
कोरोनाची हीच स्थिती झाली आहे .बरेच रुग्ण त्यामुळे भीती बाळगून व धास्तीत दिसून येतात.काही त्यामुळे खचून जातात.त्यातून ते औषधोपचाराला प्रतिसाद देत नाहीत व त्यांची प्रकृती खालावते आणि .. कोरोनावर मात करता येते .कोरोना जीवघेणा आजार नाही .परंतु लक्षणे जाणवत असतील तर वेळीच उपचार करणे जरुरी आहे .महागड्या डॉक्टर मंडळींची फी बघून आणि एकून काही लोक दचकतात.ती खरोखरीच त्यांच्या आवाक्यात नसते .पण गंभीर अवस्था नसेल.प्रारंभिक लक्षणे असतील तर तज्ञ डॉक्टरांची औषधे घेऊन घरीच आराम करता येऊ शकतो .त्यामुळे अनर्थ टळणार आहे .लक्षणे दिसतात आपली तपासणी करून घ्यावी .जर पॉझिटिव्ह असले तरीही घाबरण्याचे कारण नाही .साध्या| औषधोपचाराने आठ दिवसात ठणठणीत होऊ शकता .आणि खबरदारी घेतली तर कोरोना आपल्या जवळपास फिरकणार नाही हेही खरेच आहे.