सैन्यदलातून निवृत्त झालेल्या श्री. शिवाजी सुभाष शिंदे यांचा आमदार व महापोरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार.!

0
29
सैन्यदलातून निवृत्त झालेल्या श्री. शिवाजी सुभाष शिंदे यांचा आमदार व महापोरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार.!

साईमत जळगाव प्रतिनिधी

ईश्वर कॉलनी येथील आर्मी सैनिक शिवाजी सुभाष शिंदे हे २६ वर्ष प्रदीर्घ देशसेवा देऊन नुकतेच ता. १ जुलै रोजी मणिपूर येथून निवृत्त झाले. याप्रसंगी ता. २ जुलै रविवार रोजी त्यांचा भव्य नागरी सत्कार जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता एच. एच. चव्हाण, नगरसेवक कुंदन काळे, नवयुवक मराठा विकास मंडळाचे अध्यक्ष संजय मराठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन सरोदे हे उपस्थित होते.

श्री. शिवाजी शिंदे यांचे ता. २ जुलै रविवार रोजी सकाळी ७ वाजता रेल्वे स्टेशनवर आगमन झाले यावेळी त्यांचे आप्तस्वकीय व नातेवाइकानी फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे स्वागत केले. यानंतर शहरातील चिमुकले राम मंदिर वरून सुशोभित केलेल्या व तिरंगाने सजलेल्या जीपमधून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “वीर जवान तुझे सलाम”,जय जवान जय किसान अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमून गेले होते. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी त्यांचे औक्षण व रांगोळी काढण्यात आली होती. तसेच शहरात स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आले होते.

यानंतर त्यांच्या घराजवळ आप्तेष्ट, शहरवासियांच्या व सर्व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्निक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे म्हणाले कि,  आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या बहाद्दर सैनिकांचा आपुलकीने सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, आपल्या शहरातील श्री. शिवाजी शिंदे या सैनिकांचा आम्हाला नक्कीच गर्व आहे, भारतीय सैन्यात चांगली सेवा देऊन नुकतेच सेवानिवृत्त होऊन सुखरूपपणे आपल्या कुटुंबात परत आले त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी भारतीय सैन्य दलात भरती व्हावे तसेच वृक्षारोपनाचा संकल्प करावा असे मत त्यांनी यावेळी मांडले.

यानंतर शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी ऊन, वारा व पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत शत्रूंशी झुंजणाऱ्या वीर सैनिकांचा आम्हाला सदैव सार्थ अभिमान आहे. २६ वर्ष घर आणि कुटुंबापासून दूर सीमेवर प्राणांची बाजी लावून देशसेवा करणारे श्री. शिवाजी शिंदे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्यात यानंतर मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता एच. एच. चव्हाण यांनी म्हटले कि, भारतीय सैनिकांच्या कारगिल येथील शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. आणि या युद्धात श्री. शिवाजी शिंदे यांचा सहभाग असल्याने त्यांचा आपल्या शहरवासीयांना मोठा अभिमान असून आपल्या २६ वर्षाच्या कार्यकाळात श्री शिंदेनी देशाची मोठ्या सचोटीने सेवा केली असून पुढील आयुष्यात त्यांनी अजून सामाजिक चळवळीत सहभागी राहावे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी यावेळी केले. यानंतर सत्कारार्थी श्री. शिवाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त करतांना आतापर्यंत देशाची सेवा करत आलेले विविध चित्तथरारक अनुभव व शौर्य गाथा सांगत असताना सर्वांचे डोळे पाणावले यावेळी प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता.

त्यांच्या मनोगतातून सैनिक हा कधीच निवृत्त होत नसतो त्याच्या रक्तात देशसेवा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असते असे सांगून यापुढे ही सिव्हील लाईफमध्ये देखील मी विधायक व सामाजिक कार्यासाठी नेहमी पुढे राहील असे सांगितले. या कार्यक्रमाला मराठा उद्योजक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मराठे, विष्णूआप्पा बाळदे, बापूराव काळे, राहुल सोनवणे व मनोज चौधरी हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाला दिपक चौधरी, संजय कोरके, नाना सोनवणे, तुषार अत्तरदे, सोनू चौधरी, रमन साखला, ज्ञानेश्वर जाधव, गणेश बोंडे, शुभम शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी आभार प्रर्दशन विजय सुभाष शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here