बुलढाण्यात खाजगी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा होरपळून मृत्य

0
18

साईमत बुलढाणा प्रतिनिधी

नागपूरहून पुण्याला निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. आधी लोखंडी खांबाला धडकून बस संरक्षक कठड्यावर आदळली. त्यानंतर उलटून काही क्षणातच बसने पेट घेतला. या अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर आठ प्रवासी बालंबाल बचावले. परंतु हायवेवरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांनी वेळीच मदत केली असती, तर आणखी जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काही जणांनी केला आहे. डोळ्यांदेखतच एका बाळाचा जळून मृत्यू झाल्याचंही एका व्यक्तीने सांगितलं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा परिसरात हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. यापैकी २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चालकासह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडले.

अपघातानंतर बसच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचांवर हात आपटत काही प्रवासी मदतीसाठी गयावया करत होते. परंतु आजूबाजूने जाणारे इतर वाहन चालक मदतीसाठी थांबले नाहीत, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. आग लागल्यामुळे आतून प्रवाशांना काचा तोडणं शक्य झालं नाही. परंतु आजूबाजूने जाणारे ट्रक, टेम्पो चालक थांबले असते. त्यांनी आपल्याकडील लोखंडी रॉडने काचा फोडण्यास मदत असती, तर मृतांचा आकडा कमी असता, असा दावाही काही जणांनी केला आहे. अपघातानंतर बाहेर आलेल्या जखमी प्रवाशांनी मदत मागितली, मात्र गाड्या थांबल्या नाहीत, असाही दावा केला जात आहे. बसच्या मागील बाजूला एक महिला आपल्या बाळासह काचेवर हात आपटत सुटकेची याचना करत होती, मात्र आमच्या डोळ्यांदेखतच त्यांचा जळून कोळसा झाला, असंही एकाने सांगितलं. मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी डीएनए टेस्ट शिवाय पर्याय नसल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे आहे. ही बस नागपूरहून निघाल्यामुळे खाजगी बस बुकिंग पॉईंट वरून ऑफिसमधून मृतांची नावं मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा व प्रशासन प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here