साईमत भुसावळ प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी आते भावाला कानशिलात लगावल्याचा राग मनात धुमसत ठेवला होता. अशातच मध्यरात्री तो तरुण डोळ्यासमोरून जात असताना संशयित तरुणाला राग आला. त्याने त्या तरुणाला थांबवले. शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाल्या आणि शेवटी संशयित तरुणाने त्या तरुणाला जवळच्या दुचाकीवर जोरात ढकलून दिले. यामुळे तो दुचाकीवर (Bike) आपटला जाऊन जोरात खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या खुनाच्या (Murder) गुन्ह्याप्रकरणी भुसावळ (Bhusawal) तालुका पोलीस स्थानकात संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, मंगल शांताराम शेळके (वय २३ ) हा आपल्या परिवारासह तालुक्यातील फेकरी ( Fekari) येथील वाल्मिक नगरात वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीला संतोष लक्ष्मण बावस्कर या व्यक्तीने हाताला चावले होते. या लहान मुलीचा मयत मंगल शेळके हा नातेवाईक आहे. मंगलने त्यावेळी संतोष बाविस्कर याला मुलीच्या हाताला का चावला म्हणून जाब विचारला होता. त्यावेळी मंगलने संतोष बाविस्करच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी संशयित राहुल तुकाराम पाडळे (वय २७, रा. फेकरी) याने तेथे येऊन माझ्या आत्याभावाला संतोषला कानात का मारले म्हणून विचारणा केली. तसेच तुला पाहून घेईन अशी धमकी मंगलला राहुलने दिली होती.
आतेभावाला मंगलने कानशिलात मारली हा राग राहुलने मनात ठेवला होता. शुक्रवारी (Friday) १६ जून रोजी रात्री १२ ते पहाटेच्या दरम्यान फेकरी उड्डाणपुलाजवळ राहुल पाडळे हा बसला होता. त्या ठिकाणाजवळून मंगल शेळके हा जात होता. राहुलने मंगलला थांबवून जुना वाद उकरून काढला. मंगलने मोठा भाऊ आकाश याला फोन करून सांगितले की, संशयित राहुल पाडळे हा माझ्याशी वाद घालत आहे. त्यावेळी आकाश देखील तिथे गेला. माझ्या भावाला का मारतो आहेस, असे राहुलला विचारले असता त्यांनी सांगितले की त्याने मागे माझ्या आते भावाला मारले होते.
त्या वेळी राहुल पाडळे याने मंगलला शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवर राहुलने मंगलला ढकलून् दिले. तेथे त्याच्या डोक्याला जबर् मार लागला. त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता तेथून भुसावळ सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला मयताचा भाऊ आकाश शेळके याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राहूल तुकाराम पाडळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुळकर्णी करीत आहे.
