साईमत पाळधी, ता.धरणगाव प्रतिनिधी
येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती उत्सवानिमित्त पाळधी येथील पोलीस स्थानकाजवळील मिरची ग्राउंडवर शनिवारी, 10 जून रोजी सायंकाळी सात वाजता गायक आनंद शिंदे यांच्या भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला गायक आनंद शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गायन करून महापुरुषांच्या कार्याला उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीचे अनेक दिग्गज नेते आदी उपस्थित राहतील.
पाळधी खुर्द येथे बौद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण आनंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आनंद शिंदे हे जवळपास 30 वर्षानंतर जळगाव परिसरात कार्यक्रमासाठी येत आहेत. पाळधी येथे हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. आंबेडकरी समाजाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख तथा पं.स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, मागासवर्गीय सेनेचे नाना भालेराव, मोहन शिंदे, अमोल गजरे, मिलिंद नन्नवरे, मनोज नन्नवरे, बंटी नन्नवरे, आनंद इंगळे, राहुल सपकाळे यांच्यासह आदींनी केले आहे.