साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक शहरातील एक ध्येयवादी,सामाजिक बांधिलकी सांभाळणारी व उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारी नामवंत शिक्षण संस्था आहे. ‘विद्या यश सुखकरी अर्थात विद्या यशोदायी असते,सुखदायी होते’ हे आपले ब्रीदवाक्य सतत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून प्रत्यक्षात आणणारी आदर्शवत शिक्षण संस्था आहे.
वर्धापन दिनाचे निमित्ताने संस्थेचा आढावा….
कुठल्याही संस्थेच्या वाटचालीत शंभर वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असतो. गेल्या शंभर वर्षाचा संस्थेचा प्रवास हा सृजन आणि देशभक्त नागरिकांनी एकत्रितपणे निरलस वृत्तीने केलेल्या सेवा कार्याचा आहे. आद्य संस्थापकांनी ज्या मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून संस्था सुरू केली, त्याच मार्गावरून गेली शंभर वर्ष संस्थेची वाटचाल सुरू आहे. ज्ञान हेच सर्वोच्च मानून निस्वार्थ वृत्तीने शिक्षण क्षेत्रात आधुनिक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत राहायचे, ही मूल्ये काळाच्या कसोटीवर आजही खरी ठरली आहेत. संस्थेच्या विविध शाळातून उत्तम शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आज जगभर निरनिराळ्या क्षेत्रात असामान्य कर्तुत्वाने आपला ठसा उमटवत आहेत. अनेक डॉक्टर्स ,अभियंते, चार्टड अकाउंटंट याचबरोबर सेवाभावी कार्यकर्ते राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ,अभिनेते, लेखक ,कलाकार, खेळाडू यांचा समावेश आहे. अनेक जणांना आपल्या कार्याबद्दल विविध गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळे संस्थेचे नाव आजही सर्वत्र आदराने घेतले जात आहे.
शाळेचा व संस्थेचा यशाचा पाया ज्यांनी रचला ते म्हणजे विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक!, शिक्षक हा पेशा न मानता ज्ञानदान हे जीवन वृत मानून संपूर्ण समर्पित वृत्तीने जगलेल्या शिक्षकांची मोठी परंपरा संस्थेला लाभली आहे. शिक्षकांच्या अतुलनीय योगदानामुळे संस्थेला आजचे वैभव प्राप्त झाले आहे अनेक कुशल शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल वेळोवेळी गौरविण्यात आले आहे. ज्ञानदानाची ही समृद्ध परंपरा पुढे चालू राहावी यासाठी संस्थेचे कार्य कुशल व उपक्रमशील अध्यक्ष, शिक्षण तज्ञ प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी मंडळ सदस्य व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
सन १९०८ साली रेव्हरंड शिंदे यांनी ख्रिश्चन मिशनरी सोसायटीच्या माध्यमातून सेंट जॉर्जेस ही ‘प्राथमिक शाळा’ सुरू केली.याच कालावधीत राष्ट्रीय विचाराने प्रेरित झालेल्या वातावरणात शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाली आणि शाळा बंद करणेचा निर्णय घेतला.शाळा बंद होणार असे समजताच शिक्षणावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना दैवत मानणाऱ्या शाळेतील शिक्षकांच्या मनात शाळा चालविण्याचे आले आणि १ एप्रिल १९२३ रोजी कै.स.दि. तथा नानासाहेब अभ्यंकर व अन्य शिक्षक यांनी शिक्षण प्रेमी नाशिककर यांच्या सहकार्याने संस्थेची स्थापना केली. रावबहाद्दूर वि. अ. गुप्ते संस्थेचे पहिले अध्यक्ष व मो.रा.गोडबोले हे शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते.१९३८ च्या जवळपास शाळेला सरकारने जागा दिली तर मुंबईतील पेठे बंधूनी दिलेल्या उदार देणगीतून व सह्याद्री विमा कपनीने कर्ज दिल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात ‘पेठे विद्यालयाची’ देखणी इमारत उभी राहिली. नानासाहेब कर्वे,वा.के.खरे यांनी संस्थेची धुरा सांभाळली.नंतर संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थी, देणगीदार यांच्या माध्यमातून संस्थेचा विस्तार झाला.पूर्वीची शारदा मंदिर आणि आजची सारडा कन्या विद्या मंदिर मुलींची शाळा,सावरकरांच्या भगूरच्या भूमीत ति.झं.विद्यामंदिर, नवीन इंग्रजी शाळा (ओझर),सेठ ध.सा.कोठारी मुलींची कन्या शाळा (नाशिकरोड),माध्यमिक विद्यालय उंटवाडी, (सिडको),आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण मिळावे म्हणून द्वारका येथे श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम हायस्कुल सुरू करण्यात आले आहे.शाळेने नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. शाळेने सतत शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासत राज्याच्या शिक्षण विभागात आदर्श निर्माण केला आहे.
सागरमल मोदी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली त्यानंतर मेरी विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि परिसरतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता सी.डी.ओ.मेरी हायस्कुल सुरू करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी परिसरातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी त्रंबकेश्वर जवळ वेळुंजे येथे आश्रमशाळा सुरू करण्यात आली.जिल्ह्यातील आदर्श आश्रमशाळा म्हणून नावारूपाला आली आहे. गेल्या अनेक वर्षीपासून दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. आज संस्थेच्या बालवाड्या आहेत,पहिली पासून चौथी पर्यंत सेमी इंग्रजी भाषेत ज्ञान देणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत तर द्वारका,सिडको,मेरी भागांत इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारलेल्या आहेत.आगामी वर्षांपासून ज्युनिअर कॉलेज सुरू होणार आहे,त्याची संपुर्ण तयारी झाली आहे असे समजल्याने आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे. वेळुंजे येथील प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व मुलांची सोयीसाठी संस्था अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर यांच्या प्रयत्नाने इंडिया बुल्स कंपनीच्या मदतीने सोलर पॅनल बसवून विजेची बचत करण्यात आली आहे तर जुन्नरे शाळेची भव्य इमारतीत देखील इलेक्ट्रिक बिलाची बचत व्हावी म्हणून उपाध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या प्रयत्नाने माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सोलर पॅनल बसविण्यात आले आहे.
दरवर्षी विद्यार्थ्यांची संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी केली जाते,शैक्षणिक उपक्रम समिती मार्फत गुणवत्ता वाढीसाठी विविध व्याख्याने,प्रशिक्षण यांचे आयोजन करण्यात येते.संस्था अध्यक्ष प्रा. रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी बचतीबाबत संस्कार केले जातात तर प्लास्टिक बचतीबाबत उपक्रम राबविले जातात. मराठी शाळा टिकाव्यात म्हणून खास उपक्रम राबविण्यात आले.सर्वच शाळांत उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या तंत्रशिक्षण समिति मार्फत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन संगणक संगणक शिक्षणाचा पाया घातला. संगणकाचे उत्तम पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना न देता प्रत्यक्ष संगणकाचा विद्यालयाच्या रोजच्या व्यवहारात उपयोग कसा करता येईल याची प्रणाली निर्माण करण्याची संधी सुद्धा विद्यार्थ्यांना दिली जात आहे परीक्षांचे व्यवस्थापन, निकाल पत्रके, शाळेची नित्य प्रशासकीय कामे इत्यादी विविध कामे संगणकाच्या मदतीने केली जात आहेत.बालवाडी शिक्षिका कोर्स चालविण्यात येऊन आदर्शवत शिक्षिका घडविल्या जात आहेत. संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांचे जीवन सर्व अंकांनी विकसित व्हावे यासाठी त्यांच्या कलागुणांनाही जोपासण्याची जरुरी असते अशा विचारांनी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी नाट्य स्पर्धा, नाट्य वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असते. शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेतील सर्व आजी-माजी विद्यार्थी व कलाकार शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकत्रित करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हेमेन्द्र कोठारी फाऊंडेशन माध्यमातून इंग्रजी भाषेबाबत व विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत.विविध देणगीदारांनी ठेवलेल्या ठेवीतून संस्थेतील शिक्षक व कर्मचारी यांना पुरस्कार दिले जातात तर संस्थेचे आदर्शवत कार्यवाह तथा मुख्याध्यापक कै ब.चिं.सहस्रबुद्धे यांच्या नावाने जिल्ह्यातील विविध शाळातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येते.
नासिक एज्युकेशन सोसायटीने शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेच्या नामवंत माजी विद्यार्थ्यांची शंभर व्याख्यानांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या प्रगतीसाठी ज्यांनी विशेष योगदान दिले आहे अशा माझी विद्यार्थी व सेवानिवृत्त पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्याचबरोबर संस्थेला नेहमीच मोलाचे सहकार्य करणारे आणि मार्गदर्शन करणारे चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक, बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार, संस्थेला भरीव देणगी देऊन मोलाची मदत करणारे देणगीदार, संस्थेच्या योगदानात मोलाची कामगिरी करणारे माजी अध्यक्ष,कार्यवाह,शिक्षक मंडळ अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी तसेच माजी पदाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी यांच्याप्रती देखील मेळाव्याचे आयोजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
अतिशय कमी विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या नासिक एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या २२ इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आज २३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शंभर वर्षात संस्थेने आपली वैभवशाली परंपरा सातत्याने पुढे नेली आहे .शाळेतून उत्तीर्ण होऊन विविध क्षेत्रात उच्चतम यश मिळविणाऱ्या, समाजात मान्यता मिळवणाऱ्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची नामावलीच त्याचा उत्तम पुरावा आहे.
अशा नामवंत संस्थेची धुरा संस्थेच्या पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. सूर्यकांत राहळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके चंद्रशेखर मोंढे,कार्यवाह राजेंद्र निकम सांभाळत आहेत. प्रा.रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ व शिक्षक मंडळ विविध उपक्रम आयोजित करून संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.
श्री उमेश कुलकर्णी,उपशिक्षक,सदस्य,शिक्षक मंडळ
नासिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक