साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी
चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स अँड के.के.सी कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी तमाम भारतीयांच्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
बाबासाहेबांनी भारतीय समाजातील जात, धर्म, वर्ग, लिंग, आदी भेदांमध्ये अडकलेल्या समाजातील दरी नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. खऱ्या अर्थाने मानवाच्या, माणुसकीच्या प्रस्थापनेसाठी अहोरात्र काम केले, लेखन केले. संविधानाचे निर्माण आणि लोकशाहीसाठी आग्रही राहून, न्याय, समता, समाज परिवर्तन, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यासाठी समाज परिवर्तनाची चळवळ निर्माण केली. दलीत वंचित उपेक्षित वर्गाला शिक्षणाची वाट दाखवून त्यांच्या जीवनात नवी पहाट आणली व शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतीमंत्र दिला. डॉ. बाबासाहेबांचा विचार समाजातल्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहचवला पाहिजे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असे आवाहनही उपस्थित सर्वांना केले. संविधानांचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची कृतज्ञता त्यांनी मनोगतातुन व्यक्त केली.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.अजय काटे उपप्राचार्य बी. आर. येवले यांची उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वैशाली पाटील यांनी केले. प्रा. अंकुश जाधव, व प्रा. एस. वाय. पवार यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.