साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र वैश्विक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने आज स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत भाविक, पुजारी, व्यापारी, शहरवासीय यांच्या समवेत मंदिर विकासाच्या मुद्यां संदर्भात श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय, तुळजापूर येथे बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.
सदरील बैठकीत भाविक, पुजारी, शहरवासीय व व्यापारी या सर्वांची मते व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. विकास कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वास्तुविशारद सल्लागार संस्थेला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. चांदी सोन्याचा गाभारा व शिखर रंगकाम या बाबतचा अहवाल तातडीने तयार करण्याच्या सुचना देण्यात आले आहेत.
श्रीक्षेत्र तुळजापूरचा पुढील ३० वर्षाचा विचार करुन पायाभुत सुविधा निर्माण करण्यासह आगामी ५ वर्षात आई भवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या तीप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तुळजापूर तिर्थक्षेत्र वैश्विक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी सल्लागार नेमणूक हा एक महत्वपुर्ण टप्पा होता व आज हा टप्पा पुर्ण झाल्याचे समाधान आ.राणाजगजिसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे. प्रकल्प अहवाल पुर्ण होताच केंद्र व राज्य सरकारसह सी एस आर च्या माध्यमातून जलदगतीने दर्जेदार कामे करुन घेण्याचा संकल्प देखील आ.राणाजगजिसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.