साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी (भूषण पाटील)
T20 World Cup 2022 ला सुरुवात झाली आहे. यावेळी टीम इंडिया आपला पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. याआधी सराव सामने खेळवले जात आहेत. यामध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला होता. आता दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. यापूर्वी महान खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) यावेळी कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील हे सांगितले.
2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघांच्या यादीत सचिनने भारताचे नावही नोंदवले आहे. एका न्यूज वेबसाईटच्या बातमीनुसार, सचिनने या यादीत भारतासोबतच पाकिस्तानचाही समावेश केला आहे. या दोन संघांशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी दावेदार म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
सचिनने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आमच्या पूलमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली तर ते उपांत्य फेरी गाठू शकतात. जर ते पोहोचले नाहीत तर दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर खेळत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. यासह इंग्लंडला दुसरा पर्याय आहे.”
विशेष म्हणजे टीम इंडिया फॉर्मात आहे. सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. यादरम्यान केएल राहुलने 33 चेंडूत 57 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 33 चेंडूत 50 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ 180 धावा करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने ४ बळी घेतले. भुवनेश्वर कुमारलाही दोन यश मिळाले.