साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेबांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, हे अत्यंत क्लेशदायक… वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलांनी एका मिनिटात गमावले, असे खडसेंनी म्हटले आहे. तसेच आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले, ही वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.