साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुंबई येथे मंत्रलायात राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दि.28 सप्टेंबर रोजी दुपारी दरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील , औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उद्योग मंत्र्यांनी मुक्ताईनगर मतदार संघासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या औद्योगिक वसाहतच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेतला. त्यानुसार जागेची पाहणी, जागेचे सर्वेक्षण , भू निवड समितीच्या अहवालाचा संपूर्ण तपशील, अशा सर्व बाबींचा परामर्श घेवून बैठकीत सारोळा ता.मुक्ताईनगर परिसरात सुमारे 600.25 एकर (सव्वा सहाशे एकर) क्षेत्रफळावरील जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली.
लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान मुक्ताईनगर मतदार संघासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यास तत्वतः मंजुरी मिळाल्याने ऐन नवरात्रीत ही एक आनंदाची भेट ठरली आहे.यानिमित्ताने सर्वत्र आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वगुणांचे आभार मानले जात आहेत. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘साईमत’शी बोलताना ही आनंदाची बातमी दिली व मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगर दौऱ्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल आभार मानले आहे.
दरम्यान , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील वजनदार मंत्र्यांचा नुकताच दि 20 सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर येथील दौरा पार पडला. दौऱ्यानिमित आयोजित जाहीर सभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघातील बेरोजगारी व कृषी उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी मतदार संघात औद्योगिक वसाहत उभारण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे अवघ्या आठ दिवसात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी मुक्ताईनगर मतदार संघाला मोठे गिफ्ट दिले असून मतदार संघासाठी ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याने सर्वत्र आ.चंद्रकांत पाटील यांचे कौतुक होत आहे.