साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचेसह सहाय्यक फौजदार महाजन यांचे निलंबन केले आहे. आता बकाले यांच्या जागी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख म्हणून पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक किसनराव लक्ष्मण नजन पाटील पाचोरा पोलीस ठाणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक आदेश होईपावेतो त्यांचा मुळ नेमणुक पाचोरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी या पदाचे कामकाज सांभाळून पाहतील.
किसनराव नजन – पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये यशस्वी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धत पाहता एलसीबी या महत्त्वाच्या विभागात त्यांची नेमणूक पोलीस अधीक्षकांनी केली आहे. किरण कुमार बकाले यांच्याप्रमाणे आताही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी किसनराव नजन – पाटील यांच्या कार्यकाळात कायम चांगली राहील अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान, किसनराव नजन-पाटील हे डॅशिंग अधिकारी म्हणून जिल्ह्याला परिचित आहेत. तसेच शांत स्वभाव आणि कायद्याचे भोक्ते असल्यामुळे हा पदभार त्यांच्याकडे कायम ठेवला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. परंतू त्यांचे विभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रमोशनही अवघ्या काही महिन्यात होणार असल्याचे समजते. जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर, भुसावळ, चोपडा, पाचोरा पोलीस स्थानक आदी पोलीस स्थानकात त्यांनी आजवर सेवा बजावली आहे.