साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
अपंगांसाठी सभागृह बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे न करता आणि अपूर्ण असताना तसेच इतर काही कामे प्रत्यक्ष जागेवर न होता फक्त कागदोपत्री करून संबंधित ठेकेदारांना संपूर्ण कामाची बिले अदा केल्याचा गैरप्रकार,भ्रष्टाचार आणि यावल पंचायत समिती तपासणी संशयास्पद असल्याची घटना यावल तालुक्यातील डोंगर कठोरे ग्रामपंचायत मध्ये घडल्याची तक्रार खुद्द ग्रामपंचायत सदस्यांने केल्याने ग्रामपंचायतच्या संपूर्ण कारभाराची चौकशी झाल्यास ग्रामपंचायतचा मोठा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही असे डोंगर कठोरा ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.
ग्रामपंचायतच्या वसुली निधी मधून गावातील अपंग बांधवाना आतापर्यंत कोणताच लाभ दिला गेला नाही.अपंग बांधवांवर ग्रामपंचायतीने आता पर्यंत कोणत्या योजनेतून किती निधी खर्च केला आहे किंवा नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे का? असे सुद्धा बोलले जात आहे,सन 2021 ते 2022 मध्ये अपंग बांधवांनी सतत मागणी व पाठपुरावा केल्याने ग्रामपंचायतने रीतसर ठराव करून अपंगासाठी सभागृह सर्वानुमते मंजूर केले, ते बांधकाम कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले. बांधकाम आजही अपूर्ण असताना ठेकेदाराला 4 लाख 38 हजार रुपये मध्ये सर्व स्टाईल,खिडकी, बांधकाम, संडास,स्लॅपसह देण्यात आले परंतु सभागृहाचे काम आतापर्यंत 50 %च झाले आहे.
आणि ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी संबधित ठेकेदाराशी संगनमत करून कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता परस्पर चेकद्वारे पेमेंट केले आहे, ठेकेदाराला दिलेले चेक कोणत्या तारखेला व किती रुपयाचा दिला चेक नंबरसह ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावाचे आवडते सामाजिक कार्यकर्ते जुम्मा रशीद तडवी यांनी सविस्तर माहिती दिली,त्यांनी 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना टपालाने पत्र व्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी जळगाव,यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी हे काय कार्यवाही करतील किंवा नाही?याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा असून डों.कठोरा ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराबाबत सरपंच नवाज तडवी,ग्रामसेवक शांताराम तिडके,व संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही होईल किंवा नाही.याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.