जळगाव : गणेश पाटील
सत्ता मिळूनही कार्यकर्ते व पदाधिकारी यांची कामे होत नसल्याने भ्रमनिरास झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. संपर्क प्रमुखांकडे गार्हाणी मांडूनही काही उपयोग होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी संपर्क प्रमुखांकडे वेळ नाही परंतु एखाद्या ‘अर्थ’पूर्ण विषयात तोडगा काढण्यासाठी विमानाने तात्काळ जळगावी धाव घेऊन कुणालाही न भेटता दौरा आटोपून निघून जाणार्या संपर्क प्रमुखांना कुठलीच वेळेची अडचण येत नाही.
नुकतेच दोन दिवसांपूर्वी संपर्क प्रमुख विमानाने एक दिवसाचा दौरा आटोपून कुणाही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना न भेटताच निघून गेले. पक्षात या दौर्याची चर्चा जोरात सुरु आहे. काही धनाढ्य व्यक्तींचे संपत्ती संबंधीच्या एका वादातीत विषयासंदर्भात ‘अथ’पूर्ण तोडगा काढण्यासाठी हा दौरा त्यांनी केल्याची चर्चा आहे.यात मोठी आर्थिक तोडपाणी झाल्याचीही चर्चा आहे.
या बाबतीत संपर्क प्रमुख संजय सावंत यांचेशी साईमत प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की, मी स्वखर्चाने विमानाने जळगवी आलो हे सत्य आहे. तीन मोठया व्यक्तींच्या प्रॉपर्टीचा वाद होता. त्यात सर्वसामान्य काही व्यावसायिकांचे अनेक वर्षापासून पैसे अडकले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलो होतो. एखादा अनेक वर्षांपासूनचा वाद माझ्या मध्यस्थीने मिटत असेल तर त्यात गैर काय आहे, असे स्पष्ट मत त्यांनी या विषयावर बोलतांना व्यक्त केले.