साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. हा खून इतका भयंकर होता की तरुणाला तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जागीच गतप्राण झाला होता. दरम्यान, खुनाला पूर्व वैमनस्याची किनार असल्याचे निष्पन्न होत असून याबाबत दोघांन विरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश उर्फ गोलू उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हाने) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर हा प्रकार अवैध वाळू व्यवसायातून घडल्याची चर्चा देखील सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी भावेश त्यांच्या काही मित्रांसह मध्यप्रदेशातील सेंधवा येथे ट्रॅक्टर ट्रॉली सोडविण्याच्या कामासाठी गेला होता. संध्याकाळी ७ वाजता तो आव्हाणे येथे परतला. घरी परतत असताना कानळदा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मी येथे संशयित आरोपी मनीष नरेंद्र पाटील (वय २२, आव्हाणे) व भूषण रघुनाथ सपकाळे ( वय ३२, रा. खेडी खुर्द ता. जळगाव) यांच्याशी भावेश याचा वाद झाला. त्यानंतर तो घरी दुचाकीने जळगावात निवृत्ती नगर येथे आला. काही वेळाने रात्री १२ वाजेच्या सुमारास संशयितांनी भावेश याच्या घरी येऊन गोंधळ घातला .
यावेळी भावेश हा घरापासून काही अंतरावर निवृत्ती नगरातील बंधन बँकेच्या समोर गेला असता संशयितांशी बोलत असताना संशयित मनीष व भूषण यांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. जुन्या वादातून हि हत्या झाल्याचे मयताचा चुलत भाऊ कैलास पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. हा वाद खेडी येथील वाळूमाफिया भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२) तर दुसरा आव्हाणे येथील मनीष नरेंद्र पाटील (वय २२) या दोघाच्या विरोधात कैलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हापेठ पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह पोलिसांनी तत्काळ परिस्थिती हाताळत संशयितांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर त्यांच्या मागावर पथक रवाना केले आहेत. मयत भावेश याच्या पश्चात वडील, पत्नी, मुली, भाऊ असा परिवार आहे.
मयत भावश पाटील याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नेण्यात आला. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान गेल्या ५ महिन्यात खुनाची हि १३ वि घटना आहे. तर गेल्या चार दिवसातील जिल्ह्यातील हि तिसरी घटना आहे. सतत होणाऱ्या खुनांमुळे जळगावकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खूनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, सपोनि किशोर पवार आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पो.नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप चांदेलकर , पो.ना. जितेंद्र सुरवाडे हे करीत आहे.