साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात गौण खनीज व अवैद्य वाळू माफियांची दहशत वाढली असून अनेक ठिकाणी अवैद्य वाळू साठे पडून आहे. तर अवैद्य गौण खनिज उत्खनन करून सुरु असलेल्या चोरटी वाहतूक विरोधात महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ ईश्वर इंगळे यांनी १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारास शिंदे सरकारच्या कार्यकाळात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे .दि.१६ हा उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने हि शोकांतिका म्हणत सुज्ञ नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मात्र प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने अधिकारी व कर्मचारी हे एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
महसुलचा अनागोंदी कारभार, तहसीलदार अनभिज्ञ— अवैध वाळू साठ्यांचे पंचनामे करून कारवाई करणे व अवैधरित्या गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि .१५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचे निवेदन ईश्वर इंगळे यांनी दि. २८ जुलै रोजी तहसील कार्यालयात दिले होते. मात्र सोळा दिवस उलटूनही निवेदन तहसीलदार यांच्या समोर आलेच नसल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.तहसीलचे कर्मचारी व अवैधरित्या वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याने निवेदनाबाबत तहसीलदार अनभिज्ञ असल्याचे उपोषण स्थळी उपोषणार्थीच्या भेटी दरम्यान चव्हाट्यावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर तहसीलदारांचा अंकुश नसल्याने तहसीलच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.