गोंदियाजवळ रेल्वे अपघात : ५० प्रवासी जखमी

0
15

गोंदिया : वृत्तसंस्था

बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जाणाऱ्या ‘भगत की कोठी’ एक्सप्रेसचा गोंदिया शहराजवळ मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली. मालगाडी आणि ‘भगत की कोठी’ एक्सप्रेस यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भगत की, कोठी एक्सप्रेस छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जात होती. गोंदिया स्थानकाजवळ ही गाडी आली असता सिग्नल न मिळाल्यामुळे समोरुन येणाऱ्या मालगाडीवर ही एक्सप्रेस आदळली. या अपघातानंतर एक्सप्रेस एस-३ डबा रुळावरून घसरला. या धडकेनंतर रेल्वेमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. काहींच्या हाताला, पायाला, छातीला तर काहींना डोक्याला इजा झाली आहे. यापैकी ३ प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर पहाटे 4.30 वाजता री-रेलमेंटचे काम पूर्ण झाल्याचे भारतीय रेल्वेने सांगितले. अपघातग्रस्त पॅसेंजर ट्रेन पहाटे 5.24 वाजता सुटली आणि 5.44 वाजता गोंदियाला पोहोचली. पहाटे 5.45 वाजता वाहतूक पूर्ववत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here