मुक्ताईनगर : भारतीयांकडून “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आप आपल्या घरांवर राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यासाठी आवाहन केले आहे. अभियानाला मुक्ताईनगर येथे प्रोत्साहन मिळावे यासाठी नगरपंचायत मुक्ताईनगर प्रशासनाने कंबर कसली असून नागरिकांना यांनी राष्ट्रीय ध्वज केवळ 21 रुपयामध्ये उपलब्ध केला आहे. या ध्वजाची साईज 20 x 30 इंच आहे. यासाठी पालिकेत एक अर्ज भरून घेतला जाणार असून घरावर तिरंगा ध्वज लावणाऱ्या नागरिकांची नोंद घेतली जाणार आहे. तिरंगा केवळ 21 रुपयामध्ये पालिकेत उपलब्ध झाल्याचे व तो आधार कार्ड झेरॉक्स व एक अर्ज भरून घेवून जाण्याचे आवाहन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक ,स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.