साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
रिझव्र्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. यासह आता सध्याचा रेपो दर ५.४ टक्के इतका झाला आहे. याशिवाय २०२२-२३ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७.२ टक्के इतका वर्तवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ ते ४.१ टक्के असा असेल. २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष जीपीडी वाढ ६.७ टक्के असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रेपो दर म्हणजे काय?
बँकांना पत निर्मितीसाठी म्हणजेच दररोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक देशातील बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो दर म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात झाल्यास बँकांना मध्यवर्ती बँकेकडून कमी दराने कर्ज मिळते. परिणामी बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. या उलट रेपो दरात वाढ झाल्यास बँकांना ज्यादा दराने कर्ज मिळत असल्याने बँकाकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जांचे दर वाढवतात.