साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक केली होती. राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान मातोश्रीमध्ये हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी कलम १५३ अ या कलमाचा वापर करत अटक केली होती.
हनुमान चालीसा प्रकरणात जामीनावर सुटका झालेले खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) हे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाने गुरुवारी विशेष न्यायालयात राणा दाम्पत्याच्या नावाने अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा अटक होणार का, या चर्चेने जोर धरला आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन प्रक्रियेबाबत गंभीर नाहीत, असा दावा सरकारी पक्षाने केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना या प्रकरणावर राणा दाप्मपत्याने कोणतेही भाष्य न करण्याची अट घातली होती. परंतू राणा दाम्पत्याने त्या अटीचे उल्लंघन केल्याचा दावा करत पोलिसांनी दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.