साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी
तालुक्यातील उचंदा आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचार्यांचे दुर्लक्ष झाल्याने अक्षरश: साथीच्या काळात रुग्णांना मरण यातनांना सामोरे जावे लागत आहे. या आरोग्य केंद्रात नागरी सुविधांसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी आरोग्य अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुका अंतर्गत उचंदा आरोग्य केंद्रात वैद्यकीय सुविधा देणारे कर्मचारी आरोग्य केंद्रात दिलेल्या वेळेवर येत नसल्याची तक्रार स्थानिकांनी मनसेकडे केली होती.
यावरुन मनसेचे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी आरोग्य केंद्रा संदर्भात माहिती जाणून घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनसेचे सदस्य गजानन पाटील यांनी आरोग्य केंद्राजवळ पाहणी केली असता आरोग्य केंद्रात तापाने फणफणत असलेले रुग्ण वैद्यकीय अधिकार्यांच्या प्रतिक्षेत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आरोग्य केंद्रात अगदी सकाळी ७ वाजल्यापासुन रुग्ण वैद्यकीय सेवेच्या प्रतिक्षेत असतांनाही वैद्यकीय अधिकारी मात्र फोनवरुन पहातो, येतो, थोडावेळ लागेल असे करत रुग्णांना अक्षरश: मरणयातना भोगण्यास भाग पाडत आहे. सद्य स्थितीत पावसाळ्यामुळे परिसरात हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र अशा अवस्थेत उचंदा आरोग्य केंद्राचे आरोग्यच कर्मचार्यांच्या दुर्लक्षतेमुळे धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देवून रुग्णसेवा व आरोग्य केंद्राच्या सुविधा नागरिकांना मिळवून द्याव्या, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.